HSC Exam Hall Ticket महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या बारावी परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन जारी केली आहेत. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहे.
प्रवेशपत्र कसे मिळणार?
सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना १० जानेवारीपासून विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मुख्याध्यापकांनी ही प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना वितरित करावी. तसेच प्रवेशपत्र डाऊनलोड करताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारू नये, असे निर्देश मंडळाने दिले आहेत.
प्रवेशपत्रावर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी आवश्यक
प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची स्वाक्षरी आणि शिक्का आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जांना “पेड” असे स्टेटस असेल, त्यांची प्रवेशपत्रे “पेड स्टेटस अॅडमिट कार्ड” या पर्यायाद्वारे उपलब्ध असतील. उशिराने अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी “लेट पेड स्टेट अॅडमिट कार्ड” हा पर्याय दिला आहे.
दुरुस्तीच्या बाबतीत विशेष सुविधा
प्रवेशपत्रामध्ये नाव, जन्मतारीख, किंवा इतर तपशीलांमध्ये चूक असल्यास ती ऑनलाइन सुधारण्यासाठी “अॅप्लिकेशन करेक्शन” लिंक दिली आहे. दुरुस्तीसाठी विभागीय मंडळाची परवानगी घ्यावी लागेल. दुरुस्ती केल्यानंतर सुधारित प्रवेशपत्र “करेक्ट अॅडमिट कार्ड” लिंकवर उपलब्ध होईल.
फोटो सदोष असल्यास विशेष सूचना
प्रवेशपत्रावर फोटो सदोष असल्यास संबंधित विद्यार्थी आणि मुख्याध्यापकांनी फोटो चिकटवून त्यावर शिक्का मारावा. गहाळ झालेल्या प्रवेशपत्राच्या बाबतीत शाळेने दुसरी प्रत लाल शाईने “द्वितीय प्रत” असा शेरा देऊन वितरित करावी.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती
- डाऊनलोड करताना अचूक माहिती भरण्याची काळजी घ्या.
- प्रवेशपत्र गहाळ झाल्यास शाळेशी संपर्क साधा.
- परीक्षेला प्रवेशपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी विद्यार्थ्यांना आणि शाळांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.