MSRTC Bus updates on WhatsApp no. दिवाळीच्या गर्दीच्या काळात एसटी बसस्थानकांवर माहिती मिळवण्यासाठी होणारा त्रास आता संपणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी एक अभिनव सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे प्रवाशांना आता फक्त एक कॉल किंवा व्हॉट्सअॅपवर संदेश पाठवूनच एसटी बसची माहिती मिळू शकते.
स्वारगेट व वाकडेवाडी बसस्थानकांवर विशेष सुविधा उपलब्ध
पुण्यातील स्वारगेट आणि वाकडेवाडी यांसारख्या महत्त्वाच्या बसस्थानकांवर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या पुणे विभागाचे नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी सांगितले की, प्रवाशांच्या सोयीसाठी ९० पर्यवेक्षकांचे मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. हे पर्यवेक्षक प्रवाशांना त्यांच्या प्रवासाशी संबंधित सर्व आवश्यक माहिती देण्यास तयार असतील.
बसचे ठिकाण आणि वेळ मिळणार फक्त एका संदेशात
प्रवाशांना घरबसल्या एसटी बसची ताजी माहिती मिळवता यावी यासाठी एसटी प्रशासनाने एक व्हॉट्सअॅप क्रमांक देखील जाहीर केला आहे. प्रवाशांना फक्त 8766054235 या क्रमांकावर एसटी बसची माहिती विचारून संदेश पाठवायचा आहे. पाच मिनिटांतच प्रवाशांना त्या बसची अद्ययावत स्थिती, बसस्थानकावर पोहोचण्याची वेळ, बस सध्या कुठे आहे याची माहिती मिळेल.
आरक्षित तिकिट प्रवाशांसाठी खास व्यवस्था
एसटी प्रशासनाने आरक्षित तिकिट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक सुविधा दिल्या आहेत. जर प्रवासी पुण्यातील स्वारगेटहून सोलापूरला किंवा वाकडेवाडीतून अमरावतीला जात असेल, तर त्या प्रवाशांना त्यांच्या गाडीविषयी अधिकृत माहिती तिथल्या कर्मचाऱ्यांकडून मिळवता येईल. कर्मचाऱ्यांचा संपर्क क्रमांक तिकिटावर दिला जाईल, ज्यावर कॉल करून प्रवासी त्यांच्या एसटी बसची ताजी माहिती मिळवू शकतील.
नवीन सेवेचा प्रवाशांना होणार मोठा फायदा
या सेवेच्या मदतीने प्रवाशांना घरबसल्या एसटी बसची माहिती मिळणार आहे. महामंडळाने दिवाळीच्या हंगामात प्रवाशांचा प्रवास सुलभ करण्यासाठी केलेला हा उपक्रम अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
हे सुद्धा नक्की वाचा:- महाराष्ट्रातील शाळांच्या अभ्यासक्रमात मोठा बदल : वार्षिक वेळापत्रक सीबीएसईप्रमाणे होणार ? Maharashtra School