Sharad Pawar Election Result 2024 विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा धक्का बसला आहे. ८६ उमेदवार रिंगणात उतरवूनही केवळ १० जागा जिंकण्यात पक्षाला यश मिळाले. यामुळे शरद पवार यांची पुढील रणनीती काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
पराभव मान्य, पुढील लढाईसाठी सज्ज
कराड येथे पत्रकार परिषद घेत शरद पवारांनी पराभव स्वीकारत जनतेचा कौल मान्य असल्याचे सांगितले. परंतु, अपयशाने खचून न जाता नव्या उमेदवारांना आत्मविश्वास देऊन उभं करणं, नव्या जोमाने पक्ष बांधणी करणं, हा माझा पुढील कार्यक्रम असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
बारामतीतील पराभवाबाबत भाष्य
बारामतीमध्ये अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यात झालेली कडवी लढत चर्चेचा विषय ठरली होती. निकालात अजित पवारांनी तब्बल एक लाख मताधिक्याने विजय मिळवला. यावर शरद पवार म्हणाले, “युगेंद्र अजित पवारांच्या तुलनेत नवखे आहेत. त्यांनी मोठ्या मेहनतीने प्रचार केला, मात्र अजित पवारांचा अनुभव आणि सत्तेतलं बळ यामध्ये तुलना होऊ शकत नाही.”
“मी घरी बसणार नाही”
वयाच्या ८४ व्या वर्षीही शरद पवारांनी आपल्या सक्रिय राजकीय भूमिकेवर ठाम असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, “हा निकाल आम्हाला अपेक्षित नव्हता, पण याचा अर्थ मी घरी बसणार नाही. माझ्या तरुण पिढीचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणार आहे. भविष्यात नव्या जोमाने पक्ष उभारणीसाठी काम करणार.”
पुढील वाटचाल
Sharad Pawar Election Result 2024 पराभवानंतरही शरद पवारांनी आत्मविश्वास कायम ठेवत कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाचा आलेख पुन्हा उंचावण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली पुढील रणनीती आखली जाणार आहे, असे दिसून येते.
शरद पवारांच्या या जिद्दीने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.